कारंजा लाड दि.२२ कोरोना संचारबंदी दरम्यान संचारबंदी शिथिलता काळात आपल्या शेतात खताचे पोते व किटकनाशक घेऊन जाणाऱ्या शेतकरी तथा पत्रकार सुधीर देशपांडे यांच्यावर चुकीची हद्द दाखवून कारंजा ग्रामीण पोलीसांनी २१एप्रिल रोजी विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. यावरून कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार डी बी इंगळे व पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांची मनमानी स्पष्ट हेाते. शिवाय पोलीसांच्या या कृतीने पत्रकारांसह शेतकरी व नागरिकात नाराजीचा सूर उमटत आहे. अधिक माहितीनुसार, 21 एप्रिल रोजी कारंजा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या गंगापूर शेतशिवारातील शेतात शेतकरी तथा पत्रकार सुधीर देशपांडे त्यांचा पुतण्या राघव चंद्रशेखर देशपांडे यांच्या समवेत एम एच ३७ यु २५६३ क्रमांकाच्या दुचाकीने दुपारी ११ वाजता जात असतांना कारंजा दारव्हा मार्गावरील वीज केंद्राजवळ पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे व त्यांच्या सहकाऱ्याने दुचाकी अडवून अमानुष मारहाण केली. मात्र या संदर्भात पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांनी खोटी तक्रार दाखल करून तसेच कारंजा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घटना घडल्यानंतर कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत कामठवाड्याच्या पलिकडे घटनास्थळ दाखवून व पंचनामा करून विविध कलमानुसार खेाटे गुन्हे दाखल केले आहे. एकीकडे शासनाने शेतकऱ्याकरीता लाॅकडाउुनमध्ये शिथिलता जाहीर केली तर दुसरीकडे पोलीसांकडून मात्र शेतकऱ्यांना त्रास दिल्या जात असल्याचे या घटनेवरून अधोरेखित होते. सदर घटनेचा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने निषेध करण्यात आला असून दोषी पोलीस अधिकाऱ्याविरूध्द कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी, गृहराज्यमंत्री, गृहमंत्री व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडे केली आहे. शिवाय सदर प्रकरणी पोलीस अधिक्षकांनी दोषींविरूध्द कारवाई केल्या जाईल असे आश्वासन दिल्यानंतरही एका शेतकऱ्यावर शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी खोटा गुन्हा दाखल करण्याची किमया ग्रामीण पोलीसांनी करून दाखविली. पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांनी आपले जुने वैमनस्य उकरून शेतकरी देशपांडे यांना मारहाण केली. शिवाय त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेत. हे करतांना कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार डी बी इंगळे व पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांनी आपल्या अधिकाराचा गैर वापर केल्याचे देखील स्पष्ट होत आहे. दरम्यान अतिरिक्त पोलीस अधिक्षक विजय कुमार चव्हाण यांनी २१ एप्रिल रोजी रात्री कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनला भेट देउुन निपक्षपणे चौकशी करण्याच्या सूचना दिल्यात. तसेच घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षकांना सुध्दा चुकीचे घटनास्थळ दाखविण्यात आले. त्यामुळे सदर प्रकरणावरून अतिरिक्त पोलीस अधिक्षक काय बोध घेतात याकडे पत्रकारांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे. सदर घटनेसंदर्भात सतसत विवेक बुध्दीने व निपक्षपणे विचार केला तर शेतकरी सुधीर देशपांडे यांचे शेत गंगापूर शेतशिवारात आहे. तसेच सदर शिवार हे कारंजा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असतांना ते शेतीउपयोगी साहित्य घेऊन कामठवाड्यापलिकडे गेले असतील का, असा सवाल उपस्थित केल्या जात आहे.
चुकीची हद्द दाखवून ग्रामीण पोलिसांनी केले शेतकऱ्यावर गुन्हे दाखल ठाणेदार इंगळे व पोेलीस उपिनिरीक्षक वाघमोडे यांची मनमानी, पंचनाम्या दरम्यान घटनास्थळही बदलले