वाशिम, दि. २२ (जिमाका) : जिल्ह्यात ३ मे पर्यंत लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १९ एप्रिल रोजीच्या आदेशानुसार जिल्ह्यात काही व्यवसाय, उद्योग सुरु करण्यास सवलती देण्यात आल्या आहेत. यामध्ये फरसाण, कन्फेक्शनरी व स्नॅक्स विक्रीचाही समावेश होता. मात्र, आता या पदार्थांची विक्री करणारी दुकाने ३ मे २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत.
फरसाण, कन्फेक्शनरी व स्नॅक्स विक्रीसाठी जिल्ह्यात परवानगी दिल्यानंतर हे पदार्थ खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने १९ एप्रिल २०२० रोजीच्या निर्णयात बदल करून फरसाण, कन्फेक्शनरी व स्नॅक्सची दुकाने ३ मे २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मोडक यांनी दिले आहेत.