रिसोड(प्रतिनिधी) :-
कारंजा येथील दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार सुधीर देशपांडे यांना दिनांक 21 एप्रिल 2020 रोजी कारंजा ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीचा निषेध व्यक्त करणारे निवेदन आज रिसोड तालुका पत्रकार संघाच्या वतीने मा.तहसीलदार अजित शेलार यांना देण्यात आले.
सध्या संपूर्ण जगामध्ये कोवीड-19 या आजाराने थैमान घातले असल्यामुळे व या आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी भारत सरकार तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आलेले आहे, तरी या लॉकडाऊन दरम्यान शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी विशेष सूट शासनाच्यावतीने देण्यात आलेली असून कारंजा येथील शेतकरी तसेच पत्रकार सुधीर देशपांडे हे आपल्या शेताच्या कामानिमित्ताने जात असताना कारंजा-दारव्हा रोडवर कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या एका पोलीस अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांनी देशपांडे यांना अडवून जबर मारहाण केली, सध्याच्या परिस्थितीत पत्रकार सुद्धा जिवाची पर्वा न करता शासन-प्रशासनास योग्य सहकार्य करीत आहेत,तेंव्हा पोलिसांकडून देशपांडे यांना झालेली मारहाण दुर्दैवी आहे.तरी पत्रकार देशपांडे यांना मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन रिसोड तालुका पत्रकार संघाच्या वतीने रिसोडचे तहसीलदार अजित शेलार यांना देण्यात आले व कारंजा येथील पोलिसांनी सुधीर देशपांडे यांना केलेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेचा निषेध करण्यात आला. हे निवेदन देतांना वाशिम जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मोहनराव देशमुख, रिसोड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष जयंत वसमतकर,उपाध्यक्ष गजानन बानोरे,सचिव प्रा.विजय देशमुख, कोषाध्यक्ष पी.डी.पाटिल, संतोष वाघमारे तसेच इतर पत्रकार बांधव उपस्थित होते